Monday, July 30, 2007

डिझायर टू डाय







रविवार दिनांक २९ जुलै. दुपारी ४-४॥ सुमारास मोबाईलची रिंग वाजली.नंबर परिचीत नव्ह्ता.गेले काही दिवस साधारणत: याच वेळी टेली मार्केटींगवाल्यांचे फोन येत होते त्या मुळे हा देखील तसलाच कुठ्ला तरी फोन असणार अशा समजूतीने जरा नाराजीनेच फोन उचलला.

"केसकर का? मी बँकेतून देव बोलतोय. एस.आर.गेले"

"आम्ही लगेचच त्यांना घेउन निघत आहोत.तुम्ही ताबड्तोब या"

काही क्षण मला काहीच सुचेना. एस.आर. माझा स्कूल मेट. १९६७ मधे मी पाचवीत व एस.आर.ने सहावीत सातारा सैनिक स्कूल मधे प्रवेश घेतला. तो १९७३ मधे तर मी १९७४ मधे पास आउट झालो. त्यानंतर अचानक १९९६ साली मी व्यवसायानिमित्त आमचे खाते ज्या बँकेत उघडले त्याच बँकेत तो नोकरीस होता.तिथे आमची पुन्हा ओळ्ख झाली. गेली अकरा वर्ष मात्र कामाच्या निमित्तने आमच्या नियमित गाठीभेटी होत होत्या. एस.आर.ने काही महिन्यापूर्वी बँकेतून स्वेच्छा निवॄती घेतली होती. डायबेटीस मुळे त्याला गेले वर्ष दीड वर्ष त्रास होत होता. डोळ्यात दोष आला होता. नीट दिसत नव्ह्त. किडनी खराब झाल्यामुळे आठवडयातून दोनवेळा डायालिसिस करावे लागत होते. गेल्या वर्ष भरात पैसा देखील पाण्यासारखा खर्च झाला होता.

अलीकडे त्याची भेट फारशी होत नसे.कधी तरी त्याच्या घरी गेलो तरच भेट व्हायची.हल्ली तो मानसिक दृष्ट्या खचला होता. बहुदा आपण लवकरच जाणार आहोत हे त्याला आतून कळालेल होत. पंध्ररा दिवसापूर्वीच आमची भेट बँकेतच झाली होती.पण तेव्हा हे सगळ एवढ्या लवकर घडेल अशी कल्पना नव्ह्ती.हे अस कधी तरी ऐकाव लागणार अस वाटतच होत. ऐकाव लागणार व ऐकणे यात शेवटी फरक असतोच ना! मी व वसुधा लगेचच निघालो. त्याच्या घ्ररी खूप गर्दी झाली होती. त्याच्या पार्थिवा शेजारी त्याचा मुलगा संकेत निशब्द बसुन होता. संकेतच वय जेमतेम २४ असेल. छोटी सायली आक्रोश करत होती.वसुधा वहिनींच सांत्वन करायला आत गेली.

या सगळ्यांना सोडून एस.आर. कायमचा निघून गेला. ज्या वेळी कुटूंबाला एका भक्कम आधाराची गरज होती नेमक्या त्याच वेळी आधार तूटला. मला एस.आर.ला ओरडून विचारावस वाटत होत "काय अधिकार होता रे तूला आत्ता जाण्याचा?"

एस.आर.ला डायबेटीस होता पण त्याने कधी काळजी घेतलीच नाही. खाण्यावर कधी नियंत्रण ठेवलेच नाही. सैनिक स्कूल मधे शिकून देखील व्यायामाचे मह्त्व कधी पटवून घेतलेच नाही.डोळे बिघडले,किडनी खराब झाली तरी पथ्य पाळली नाहीत. हे सगळ माहीत असल्यामुळे अस वाटत कि तो गेला ते एका अर्थी बर झाल. आत्ता त्याला कमी हाल सोसावे लागले. कालांतराने तो अगदीच गलीतगात्र झाला असता व मग स्वत:चे व कुटूंबाचे हाल झाले असते.

आमचे अण्णा नेहमी सांगत असतात माणसा मधे सह्सा जगण्याबद्दल आसक्ती असते तर काही जणात मरणा बद्दल आसक्ती आसते. पहिली डिझाय़र टू लिव्ह -पाँझिटीव्ह तर दुसरी डिझाय़र टू डाय-निगेटीव्ह.एस.आर. मधे बहूदा मरणाबद्दल आसक्ती जास्त असावी.

Desire to die was very strong!

ईश्वर त्याच्या आत्म्यास सद्ग्ती देवो!

Saturday, July 28, 2007

सईचा पर्पलमुन मराठीत?

ब्लाँग हा प्रकार नुसता ऎकून माहीती होता.ब्लाँग म्हणजे काय ते नेमकेपणाने मला कळाले ते सईचा ब्लाँग वाचून! सई म्हणजे माझी मुलगी. तीचा "परपल मुन" नावाचा ब्लाँग आहे. अप्रतिम लिखाण करते.
तिच्या नवीन पोस्ट ची मी आतूरतेने वाट बघत असतो. फक्त मीच नव्हे तर अनेकजण तिच्या पोस्ट कडे डोळे लावून बसलेले असतात.

तिचे पोस्ट मी जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा तेव्हा तिच्यातील ललीत लेखनाचे सामर्थ्य जाणवते.भाषेवरील पकड,नेमके शब्द वापरण्यासाठी आत्मसात केलेला अफाट शब्द संग्रह व सर्वात मह्त्वाचे म्हणजे तिची निरीक्षण शक्ती. चांगल लिहीण्यासाठी बारीक सारीक गोष्टीं तपशीलात जाऊन बघाव्या लागतात तेव्हाच त्या लिहीता येतात. तिच्या प्रत्येक पोस्ट मधे तिच्या निरीक्षण शक्तिचा प्रत्यय येतो.विषय गंभीर असो अथवा हलकाफुलका तो मांड्ला जातो मात्र प्रभावीपणे. तिच्या ब्लाँग वर काही वेळा कविता देखील असतात. त्या कविता तिच्यातील संवेदनक्षमतेच,तरलतेच व या दोन्हींच नेमक्या शब्दात प्रकटीकरणाच कौशल्यच दाखवितात.

तिच्या ब्लाँग बाबतीत एकच(म्हंटली तर) अड्चण आहे कि तो इंग्लीश मधे लिहीला आहे. ब्रर इंग्लीश देखील बाळ्बोध वळणाचे नाही. त्या मुळे हा ब्लाँग फक्त जाणकार इंग्रजी वाचकांना आंनंद देऊ शकतो.

माझी अशी इच्छा आहे कि जाणकार मराठी वाचकांना देखील याचा आस्वाद घेता यावा. बऱ्याच वेळा अस वाटायच कि नेटीझन्सना ह्या ब्लाँग मधील मजकूर मराठीत भाषांतरीत करुन द्यावा. (खर तर हे भाषांतर करणे कितपत जमेल हा एक प्रश्नच आहे म्हणा पण प्रयत्न करुन बघायचा! जमला तरच पोस्ट करायचा!).
इंटरनेट वर मराठीत लिहीण्यासाठी साँफ्टवेअर शोधण्यात खूप दिवस गेले व अचानक बराहा.काँम या साईट वरुन फ्रि डाऊनलोड करता आल.
साँफ्ट्वेअरचे काम झाले. आता पुढचेच काम कठीण आहे. भाषांतर करण्यासाठी आधी सई ची परवानगी काढ्ली पाहीजे.
सई देशील ना परवानगी ?