"मनाचिया गुंती गुंफीयला शेला" अशा ओळी ज्ञानदेवांच्या मोगरा फुललाच्या शेवटी येतात.
मनाचा गुंता किती गुंतागूंतीचा असतो ना? अशा गूंत्यातून शब्दांचे शेले विणण खर तर खूपच अवघड काम आहे.
लेखक कवी,विचारवंत,ज्ञानी लोकांनी हे काम उत्तम प्रकारे केले आहे.तरी देखील मला अस नेहमी वाटत की खरोखर मनाचा गुंता पूर्णपणे व्यक्त करण्याची क्षमता शब्दात नसते.मनाचा गुंता अफाट,मनस्वि ,अगम्य असतो.बऱ्याच वेळा शब्दांना हार मानावी लागते,लाचारी पत्करावी लागते. आणि जे शब्दात व्यक्त झाल अस आपल्याला वाटत ते तरी किती व्यक्त झालेल असत?
प्रेम,माया,ममता,मैत्री ह्या सु्खद भावना तसेच द्वेष,मत्सर,असुया,शत्रूत्व अशा विकारी भावना जशा आपण अनुभवतो तशाच्या तशा शब्दात कूठ मांडू शकतो? कळत नकळतच्या वयातला त्याच्या व तिच्या नजरा मधून चालणारा संवाद येइल शब्दात मांडता? एखाद्या उदा्सवाण्या संध्याकाळी एकटेच असताना शिवरंजनीचे आर्त पिळ्वटून टाकणारे सूर ऎकल्यावर मनाची जी अवस्था होते ती तशीच्या तशी येइल का मांडता शब्दात?
म्हणू्नच काही वेळा ग्रेस,आरती प्रभू,पु.शि.रेगे सारख्या कवींच्या रचना कळल्या सारख्या व न कळल्यासारख्या देखील वाटतात, अँब्स्ट्रँक्ट फाँर्म मधली चित्र मनाला काही वेळा भावतात पण नक्की काय आहेत हे समजत नाहीत. शा्स्त्रीय संगीतातील काही सुध्दा कळत नसताना एखादी तान,सुरावट मनाला हूरहूर लावून जाते.
जीएंच रमलखूणा,पावलो कोहेलोच अलकेमीस्ट, खानोलकराच कोंडूरा वाचल्या वर अनेक प्रश्नांच मनात काहूर उठत. आपल्या मनातील भावनांच्या आवेगाला वाट करुन दिल्याशिवाय मनुष्य प्राण्याला चैन पडत नाही.कदाचीत माणसाच्या याच प्रयत्नातून विविध कलांचा जन्म झाला असावा, लेखक,कवी आपल्या भावना शब्दातून मांडण्याचा प्रयत्न करतो. डोंगर दऱ्यातील अनाहत शांतता खर तर अनूभवावीच लागते पण गूलजार सारखा प्रतिभावंत कवी त्याच्या दिल ढूडंता है... या गाण्यात म्हणून जातो "इन बर्फीली सर्दियोमें किसी भी पहाड पर वादी में गुंजती हूई खामोशीया सुने" बेळगावच्या के,बी. कुलकर्णींसारखा प्रतिभावंत चित्रकार चित्रातील प्रकाश योजनेतू्नच भावनांचा अनोखा कँनव्हास कागदावर मांडून जातो.विलायतखांसाहेबांच्या सतारी वर वाजवलेले सांजगिरीचे स्वर आपल्याला वेगळ्याच जगात घेउन जातात. भरत नाट्यम मधील पदन्यास व भावमुद्रांमधून व्यक्त होणारे भाव कित्येक वेळा शब्दापलीकडले असतात.
हे सगळ पाहील्यावर ज्ञानदेवांच्या "शब्दे विण संवादू" चा अर्थ थोडासा का होईना कळतो
The Canary Song
6 years ago